"द अल्केमिस्ट" या पुस्तकाबाबत स्पर्धा परीक्षेच्या एका डेमो लेक्चर मध्ये ऐकायला मिळाले. म्हटलं वाचूया हे पुस्तक पण आपल्याला इंग्लिश कुठे एवढं समजतंय म्हणून त्या पुस्तकाचे मराठीत भाषांतर केलेले मिळते का म्हणून शोध घेतला आणि ते मिळाल.
हॉस्टेलमधील एका रविवारी टेरेस वरील पाण्याच्या टाकीवर बसून सतत तीन चार तास बसून पुस्तक संपवलं. तसं असतंच ज्याप्रमाणे एखादा Movie खूप आवडतो आणि movie संपेपर्यंत उठू वाटत नाही. तसच एखाद पुस्तक आवडलं तर ते पुस्तक संपेपर्यंत काहीच करू वाटत नाही. पुस्तक खूप छान आहे. सर्वांनी विशेषतः विद्यार्थ्यांनी तर आवर्जून वाचाव अस प्रेरणादायी आहे. या पुस्तकामधील एक किस्सा खूप भावला. आयुष्यात सुखी कसं व्हायचं.हे त्या गोष्टीतून शिकलोय.
ती गोष्ट अशी:-
एकदा एका दुकानदाराने आपल्या मुलाला जगातल्या सर्वाधिक ज्ञानी माणसाकडे पाठवलं. सुखी होण्याचं गुपित त्याला जाणून घ्यायचं होतं. पुढचे चाळीस दिवस तो मुलगा वाळवंटात भटकत राहिला. सरतेशेवटी, एका उंच डोंगरमाथ्यावर असलेल्या सुंदर किल्ल्यापाशी पोहोचला. तो ज्ञानी माणूस तिथेच राहत होता.
आपल्या नजरेला एखादा साधू किंवा तपस्वी पडेल अशा विचारात दुकानदाराचा मुलगा पुढे झाला. किल्ल्याच्या भव्य आणि मुख्य दालनात तो येऊन पोहोचला. तिथे चांगलीच गजबज होती. अनेक व्यापाऱ्यांची ये-जा सुरू होती. घोळक्यात उभं राहून लोक गप्पांत रमले होते. एका बाजूला मंद वाद्यसंगीत वाजवलं जात होतं. त्या भागातील स्वादिष्ट पदार्थांची रेलचेल एका रुंद टेबलवर दिसत होती. तो ज्ञानी माणूस तिथे जमलेल्या प्रत्येकाशी काही ना काही संवाद साधत होता. दोन तास मुलाला तिष्ठत राहावं लागलं. त्यानंतर कुठे त्या ज्ञानी माणसाचं लक्ष मुलाकडे गेलं.
तो तिथे का आला आहे हे त्या ज्ञानी माणसाने एकाग्र चित्ताने ऐकून घेतलं, सुखाचं गुपित सांगायला त्याला त्या क्षणी मुळीच वेळ नव्हता म्हणून त्याने सुचवलं की, मुलाने दोन तास राजवाड्यात फेरफटका मारून यावा.
मुलगा तत्परतेने 'हो' म्हणाला. 'एक मात्र कर,' असं म्हणत त्या ज्ञानी माणसाने मुलाच्या हातात एक चमचा ठेवला. त्या चमच्यात तेलाचे दोन थेंब होते. 'तू जेव्हा फेरफटका मारशील तेव्हा या चमच्यामधलं तेल सांडणार नाही याकडे लक्ष दे.'
हातातील चमच्यामधल्या तेलावर नजर खिळवून तो मुलगा राजवाड्यात फेरफटका मारू लागला. पुढचे दोन तास तो अनेक कक्षांतून फिरला. कित्येक जिने चढला आणि उतरला. वेळ संपताच तो पुन्हा मुख्य दालनाकडे परत आला. 'छान!' ज्ञानी माणसाने त्याचं स्वागत केलं, 'भोजनकक्षात भिंतीवर लटकवलेले पर्शियन पडदे तू पाहिलेस का? जो बगिचा आकाराला आणण्यात मुख्य माळ्याचे दहा वर्षं गेले तो तू पाहिलास का? माझ्या ग्रंथालयात जतन करून ठेवलेले चर्मपत्रांचे जुने दस्तऐवज तुला दिसले का?
त्या मुलाला संकोच वाटला. यांपैकी काहीच त्याच्या दृष्टीस पडलं नव्हतं, अशी कबुली त्याने दिली. ज्ञानी माणसाने सांभाळायला दिलेल्या तेलाच्या दोन थेंबांवर त्याचं चित्त एकवटलं होतं.
'काही हरकत नाही! पुन्हा जा आणि माझ्या या विलक्षण जगातील एक एक गोष्टीचं अवलोकन करून ये. एखाद्या व्यक्तीचं घर आपल्याला परिचयाचं झालं नसेल, तर आपल्याला त्याच्यावर विश्वास कसा टाकता येईल?'
मुलाने सुटकेचा निःश्वास टाकत चमचा हातात धरत पुन्हा फेरफटक्याला सुरुवात केली. या वेळेस कुठलीही गोष्ट त्याच्या नजरेतून सुटली नाही. भिंती, छत, आजूबाजूचा परिसर, बगिचा, सभोवतालच्या पर्वत रांगा, सुंदर, सुगंधी फुलं आणि या साऱ्यामागे असलेली सौंदर्यदृष्टी; सारं काही त्याने निवांत बघितलं. परत आल्यावर त्याने प्रत्येक गोष्टीचा आढावा दिला.
त्याचं बोलणं ऐकून घेतल्यावर ज्ञानी माणसाने विचारलं, 'ते सगळं ठीक आहे रे; पण चमच्यामधलं तेल कुठे गेलं? मी तुला चमच्याकडे लक्ष द्यायला सांगितलं होतं.'
हातातल्या चमच्याकडे पाहताच तो रिकामा असल्याचं मुलाच्या लक्षात आलं.
त्याचा उतरलेला चेहरा पाहून ज्ञानी माणूस म्हणाला, 'मी तुला एकच सल्ला देऊ शकतो. आपल्या आजूबाजूला असलेल्या आश्चर्यकारक गोष्टी पाहणं आणि त्याच वेळेस हातातल्या चमच्यामधलं तेल न सांडू देणं हेच सुखाचं लक्षण आहे."
हे असंच असतं जीवन जगताना आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर या गोष्टीतून शिकण्यासारखं खूप आहे. शाळेत-कॉलेजमध्ये असताना मज्जा मस्ती करायची कारण ते दिवस कधीच पुन्हा अनुभवायला मिळणार नाहीत पण सोबतच चमच्यामधील तेल म्हणजे अभ्यास, घरच्या परिस्थितीची जाणीव, घरच्यांच्या अपेक्षा याकडे जरूर लक्ष दिले पाहिजे म्हणजे सांगड घालता आली पाहिजे. अजून शिकण्यासारखं खूप आहे जसे की आपल काम आणि आपले छंद, परिवार, हेल्थ यांची सांगड घालायला जमली म्हणजे आपल्याला सुखी कसं व्हायचं हे जमलं.